डीएचओ डॉ. कोपूरवाड यांचा आरोग्य केंद्रांना कडक इशारा; स्वच्छता नसेल तर वेतनवाढ रोखणार!
अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या पाहणीनंतर आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्ये; डीएचओंची मार्डीपासून स्वच्छता मोहीम

डीएचओ डॉ. कोपूरवाड यांचा आरोग्य केंद्रांना कडक इशारा; स्वच्छता नसेल तर वेतनवाढ रोखणार!
अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या पाहणीनंतर आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्ये; डीएचओंची मार्डीपासून स्वच्छता मोहीम
सोलापूर :- जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या अचानक पाहणीमुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये खळबळ उडाली असतानाच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी आरोग्य यंत्रणेला शिस्तीचा स्पष्ट संदेश दिला आहे. स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी मार्डी, होटगी, तिहे आणि कंदलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अचानक पाहणी केली.
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी स्वच्छता व देखभालीच्या कामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने डॉ. कोपूरवाड यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. आरोग्य केंद्रांचा परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि रुग्णांसाठी अनुकूल ठेवणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, निधीअभावी कामे रखडल्याचे कारण पुढे न करता आवश्यक असल्यास स्वतःच्या स्तरावर पदरमोड करूनही स्वच्छता व किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. येत्या आठ दिवसांत आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारली नाही तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावांवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची टप्प्याटप्प्याने पाहणी केली जाणार असून प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, देखभाल, दुरुस्ती आणि अडगळ व्यवस्थापनाची तपासणी केली जाणार आहे. ज्या केंद्रांमध्ये समाधानकारक काम दिसून येईल, त्यांचे अहवाल सकारात्मक स्वरूपात सादर करण्यात येतील. मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे डॉ. कोपूरवाड यांनी सांगितले.

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर आरोग्य विभागात सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे सुस्तावलेल्या यंत्रणेला वेग आला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. जिल्हाभरातील आरोग्य केंद्रांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, डॉ. विनोद अभिवंत, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी हेमंत पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
“स्वच्छता आणि देखभालीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी आदर्श बनले पाहिजे. आवश्यक सुधारणा तातडीने पूर्ण न करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा विचार केला जाईल.”
— डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर.




