“३५ हजारांची लाच घेताना राज्य कर निरीक्षक एसीबीच्या ताब्यात”
“३५ हजारांची लाच घेताना राज्य कर निरीक्षक एसीबीच्या ताब्यात”
भंडारा (प्रतिनिधी):- शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भंडारामध्ये धक्कादायक कारवाई केली आहे. बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा कार्यान्वित करून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य कर निरीक्षकाला एसीबीने रंगेहाथ पकडले असून, या घटनेमुळे कर विभागात एकच खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव मनीष मुरलीधर सहारे (वय ५०) असे असून ते भंडारा येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार व्यापाऱ्याचा जीएसटी क्रमांक ऑक्टोबर २०२५ पासून तांत्रिक कारणामुळे बंद झाला होता. व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी हा क्रमांक पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक असल्याने व्यापाऱ्याने २ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृत ऑनलाईन अर्ज केला होता. यानंतर नागपूर जीएसटी कार्यालयाच्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे, लेजर शीट सादर करून १०,४२८ रुपयांचे अधिकृत चलन देखील भरले गेले.
सर्व नियम व प्रक्रिया पूर्ण करूनही जीएसटी क्रमांक सुरु न झाल्याने व्यापाऱ्याने भंडारा जीएसटी कार्यालयात धाव घेतली. यावेळी राज्य कर निरीक्षक मनीष सहारे यांनी “काम करून द्यायचे असेल तर पैसे द्यावे लागतील” असे सांगत ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच देण्यास नकार देत व्यापाऱ्याने १५ जानेवारी २०२६ रोजी भंडारा एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची गोपनीय पडताळणी केली असता, लाच मागणीची खात्री झाली.
यानंतर २० जानेवारी रोजी भंडारा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे सहारे यांनी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या ताब्यातून लाचेची रक्कम, मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबी भंडाराचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक उज्वला मडावी, नितेश देशमुख व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
*एसीबीचे आवाहन*
शासकीय कार्यालयात कोणत्याही अधिकाऱ्याने काम करून देण्यासाठी लाच मागितल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.


