हरित महाराष्ट्रासाठी ‘मिशन मोड’; ३०० कोटी वृक्ष लागवडीचा भव्य आराखडा

हरित महाराष्ट्रासाठी ‘मिशन मोड’; ३०० कोटी वृक्ष लागवडीचा भव्य आराखडा
मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढवून पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर आधारित महत्त्वाकांक्षी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत या प्रस्तावित हरित प्राधिकरण आणि वृक्ष लागवड मिशनचा सविस्तर आढावा घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २०२६ ते २०३१ या कालावधीत मिशन मोडवर ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा. या मोहिमेमुळे राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. वृक्ष लागवडीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय यंत्रणा तसेच स्टार्टअप्सचा सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘हरित महाराष्ट्र प्राधिकरण’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्राधिकरणामार्फत विविध विभागांमध्ये समन्वय साधून एकसंध धोरण राबविले जाईल.
स्टार्टअप्ससाठी स्वतंत्र इकोसिस्टीम निर्माण केल्यास वृक्ष लागवड, संगोपन, तंत्रज्ञान वापर, डेटा मॉनिटरिंग आणि हरित रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते, असे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार तथा मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील, प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) विवेक खांडेकर, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटरचे संचालक श्री. कोलते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



