समृद्धी महामार्गावरील वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; ९ ते १३ जानेवारीदरम्यान वाहतूक तात्पुरती बंद

समृद्धी महामार्गावरील वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; ९ ते १३ जानेवारीदरम्यान वाहतूक तात्पुरती बंद
अमरावती (प्रतिनिधी):- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या काही टप्प्यांवर ९ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत तात्पुरती वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या वतीने ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत महामार्गावर आधुनिक गॅन्ट्री उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम एकूण १० टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कि.मी. ९०+५०० ते कि.मी. १५०+३०० या अंतरामध्ये गॅन्ट्री उभारण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित वाहिनीवरील वाहतूक तात्काळ पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या तांत्रिक कामकाजामुळे महामार्गावरील प्रवाशांचा काही काळ खोळंबा होण्याची शक्यता असून, वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेपूर्वी करावे, पर्यायी मार्गांचा विचार करावा तसेच महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




