डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाविरोधात आज मुंबईत ऐतिहासिक महामोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाविरोधात आज मुंबईत ऐतिहासिक महामोर्चा
मुंबई (प्रतिनिधी):- ग्वालियर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेल्या कथित अपमानाच्या निषेधार्थ आज, शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत एक भव्य व ऐतिहासिक ‘महामोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चामुळे राज्यभरात तीव्र राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या असून, आंबेडकरी चळवळ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.
हा विराट महामोर्चा वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात येणार असून, यामध्ये लाखो कार्यकर्ते आणि अनुयायी भारतीय बौद्ध महासभा मोर्च्यात सहभागी होणार सहभागी होणार आहेत.
CSMT समोर शक्तिप्रदर्शन
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), फोर्ट परिसरात आज दुपारी १:३० वाजता या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. सकाळपासूनच विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत.
नेमके प्रकरण काय?
ग्वालियर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याची घटना अलीकडेच समोर आली होती. या घटनेने आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी आणि प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठीच या महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
“हा मोर्चा केवळ निषेधासाठी नसून, अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली एक वज्रमुठ आहे,” असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपापल्या विहित गणवेशात (ड्रेस कोडमध्ये) मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार या महामोर्चाचे नियोजन करण्यात आले असून, अन्यायाविरुद्ध एकत्र येणे ही काळाची गरज आहे.”
पोलीस बंदोबस्त, वाहतूक बदल
महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा, नियंत्रण कक्ष आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. तसेच CSMT, फोर्ट आणि आजूबाजूच्या परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.



