राजकारण

आरपीआयमध्ये नाराजीचा स्फोट ,तिकीट न मिळाल्याने आरपीआयला रामराम, सुगत धसाडे आता घड्याळ चिन्हावर लढणार

आरपीआयमध्ये नाराजीचा स्फोट ,तिकीट न मिळाल्याने आरपीआयला रामराम, सुगत धसाडे आता घड्याळ चिन्हावर लढणार

पुणे (प्रतिनिधी):- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरपीआयचे इच्छुक उमेदवार सुगत धसाडे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला असून त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.

सुगत धसाडे यांनी आरपीआयकडून तिकीट मिळेल या विश्वासाने मागील पंधरा दिवसांपासून रॅली, प्रचार सभा, नागरिक भेटीगाठी तसेच जनसंपर्कावर मोठा भर दिला होता. मात्र भाजप–आरपीआय युतीअंतर्गत आरपीआयला केवळ नऊ जागा देण्यात आल्या. त्यातील सात जागांवर भाजपकडून आलेल्या ‘डमी’ उमेदवारांना तिकीट दिले गेल्याचा आरोप करण्यात येत आहे, तर केवळ दोन जागा स्थानिक आरपीआय कार्यकर्त्यांना देण्यात आल्याने अनेक इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

Oplus_16908288

या निर्णयामुळे स्वतःला डावलले गेल्याची भावना व्यक्त करत सुगत धसाडे यांनी आरपीआय नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी नेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना तिकीट दिले असून ते आता राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

सुगत धसाडे यांच्या पक्षांतरामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाली असून आरपीआयतील असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगामी निवडणुकीत याचा परिणाम युतीच्या उमेदवारांवर किती होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!