CAFO अतुल गायकवाड यांच्या कार्यशैलीविरोधात लेखा कर्मचाऱ्यांचा एल्गार
सोलापूर जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून कामकाज; राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये आंदोलन, सुमारे ३५०० कर्मचारी सहभागी
CAFO अतुल गायकवाड यांच्या कार्यशैलीविरोधात लेखा कर्मचाऱ्यांचा एल्गार
सोलापूर जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून कामकाज; राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये आंदोलन, सुमारे ३५०० कर्मचारी सहभागी
सोलापूर : महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद दादा कांबळे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (CAFO) अतुल गायकवाड यांच्या वादग्रस्त कार्यशैलीच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाज केले. या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवत संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांमध्ये काळ्या फिती लावून कामकाजाचे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात राज्यभरातील सुमारे ३५०० लेखा कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील CAFO अतुल गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबाबत लेखा कर्मचारी संघटनेने आक्षेप नोंदविला असून, त्यांच्या कार्यशैलीविरोधात राज्यभरातील लेखा कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखविली आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेतही कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नियमित कामकाज सुरू ठेवत निषेध व्यक्त केला.
• विविध कर्मचारी संघटनांचा पाठिंबा •
या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन, सोलापूर; महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ, शाखा सोलापूर; कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, सोलापूर; तसेच जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांनी लेखा कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान, काळ्या फिती लावून कामकाज करण्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट आणि मागण्यांबाबतची भूमिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकाच दिवशी झालेल्या या आंदोलनामुळे लेखा कर्मचारी संघटनेच्या मागण्यांना राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे.



