सोलापूर

मंद्रुपमध्ये जागेच्या वादातून दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ

कुऱ्हाडीने कापून मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

मंद्रुपमध्ये जागेच्या वादातून दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ

कुऱ्हाडीने कापून मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

मंद्रुप (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे जागेच्या मालकीवरून झालेल्या वादातून एका दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून कुऱ्हाडीने कापून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंद्रुप पोलिसांनी वाघेश महादेव म्हेत्रे आणि रवि महादेव म्हेत्रे या दोघा भावांविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र आडवेप्पा कांबळे (वय ३३, रा. मंद्रुप) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मंद्रुप येथील बाजार चौक परिसरात रस्त्यालगत असलेली जागा फिर्यादीचे आजोबा मल्लप्पा येगप्पा कांबळे यांच्या नावावर होती. वारसा हक्काने ही जागा फिर्यादीचे वडील व काका यांच्या नावावर असून, ग्रामपंचायतीच्या नोंदीत या मिळकतीचा क्रमांक १५७३ असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास रवींद्र कांबळे हे आपल्या काका आणि चुलत भावासोबत संबंधित जागेची साफसफाई करत होते. त्याचवेळी वाघेश म्हेत्रे आणि रवि म्हेत्रे हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. संबंधित जागा आपली असल्याचे सांगत त्यांनी कांबळे कुटुंबीयांना साफसफाई करण्यास विरोध केला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

• जातीचा उल्लेख करून अपमानास्पद भाषा •

फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांची जात माहीत असतानाही आरोपींनी जातीवाचक शब्दांचा वापर करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच, कुऱ्हाडीने कापून ठार मारण्याची धमकी देत, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर रवींद्र कांबळे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वाघेश महादेव म्हेत्रे आणि रवि महादेव म्हेत्रे या दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप करीत आहेत.

जागेच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादाला जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीचे स्वरूप प्राप्त झाल्याने मंद्रुप परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

जागेच्या वादातून दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मंद्रुप येथील प्रकार हा दलित नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक समानतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारा आहे. कायद्याने अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाला बंदी असतानाही दलित नागरिकांवरील अन्यायाच्या घटना घडत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आणि पीडितांना न्याय मिळणे आवश्यक आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!