‘हिवाळी अधिवेशन २०२५’ दूरध्वनी पुस्तिका प्रकाशित;डिजिटल क्यूआर कोडसह आता संपर्क अधिक सुलभ

नागपूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या ‘हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके’चे प्रकाशन आज नागपूर येथे पार पडले. माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
ही विशेष पुस्तिका नागपूर येथे अधिवेशनासाठी उपस्थित राहणारे;आमदार,राजकीय,प्रतिनिधी,शासकीय अधिकारी,पत्रकार,तसेच नागरिक यांना संबंधित विभाग, अधिकारी आणि अधिवेशनाशी निगडित सेवांशी त्वरित आणि सुलभ संपर्क साधता यावा, यासाठी तयार करण्यात आली आहे. या मार्गदर्शिकेमुळे अधिवेशन काळातील संपर्क प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि व्यवस्थित होईल, असे ब्रिजेश सिंह यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तिकेच्या क्यूआर कोडचेही प्रकाशन करण्यात आले.
क्यूआर कोडच्या माध्यमातून
* संपूर्ण दूरध्वनी निर्देशिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध
* कुठेही आणि कधीही मोबाईलवर सुलभपणे प्रवेश
* सरकारी खर्चात मोठी बचत
या डिजिटल सुविधेमुळे पुस्तिका छापण्यासाठी लागणारे हजारो प्रतींचे खर्च टळले असून शासनाचा निधी वाचल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
राज्य शासनाच्या पेपरलेस प्रशासन आणि डिजिटल परिवर्तन उपक्रमाचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे माहिती विभागाकडून सांगण्यात आले.
हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही संपर्क पुस्तिका उपलब्ध झाल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय जलद व पारदर्शकपणे कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




