NHM च्या मंजूर आरोग्य योजनांना आता गती; सीईओ कुशल जैन यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
मार्च २०२७ अखेर मंजूर निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे आदेश; प्रयोगशाळा, बांधकामे, DBT व आरोग्य शिबिरांचा घेतला आढावा

NHM च्या मंजूर आरोग्य योजनांना आता गती; सीईओ कुशल जैन यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
मार्च २०२७ अखेर मंजूर निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे आदेश; प्रयोगशाळा, बांधकामे, DBT व आरोग्य शिबिरांचा घेतला आढावा
सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) सन २०२६-२७ मध्ये मंजूर झालेल्या विविध आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने नियोजनाला गती देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यकारी समिती व सन २०२६-२७ पी.आय.पी. आढावा बैठक जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी मंजूर योजनांचा वेळेत व परिणामकारक पद्धतीने लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध सूचना देण्यात आल्या.

बैठकीत NHM पी.आय.पी.मध्ये मंजूर करण्यात आलेल्या प्रत्येक बाबीचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर सीईओ कुशल जैन यांनी विशेष भर दिला. मंजूर निधी मार्च २०२७ अखेर खर्च होईल, यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या विविध बांधकाम कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. तालुकास्तरावर उभारण्यात येणाऱ्या प्रयोगशाळांच्या बांधकामाची प्रगती तसेच आवश्यक साहित्य खरेदीच्या प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. ही कामे प्रलंबित न ठेवता बांधकाम व साहित्य खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सीईओ कुशल जैन यांनी दिले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) मिळणारे लाभ वेळेत अदा करण्यासाठी आधार सीडिंगची प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लाभार्थी, आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य सेविकांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करावी आणि प्रलंबित देयके अदा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
साखर कारखाना परिसरात मोठ्या संख्येने येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आरोग्य संस्थांमधून निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त कंपनीसोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रलंबित व थकीत देयके तातडीने सादर करण्यासोबतच आरोग्य विभागातील खराब झालेल्या कोल्ड चेन उपकरणांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
आरोग्य विभागातील मंजूर योजना, बांधकामे, निधीचा विनियोग, लाभार्थ्यांना मिळणारे DBT लाभ आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता या सर्व बाबींची अंमलबजावणी वेळेत व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सीईओ कुशल जैन यांनी बैठकीत दिले.
बैठकीस आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



