महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सोलापूर महानगरपालिकेची कडक भूमिका
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिकेकडून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या देखरेखीखाली शहरातील सर्व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीची विशेष तपासणी मोहीम सुरू केली जात आहे.

सरकारने घोषित केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना संपूर्णपणे मोफत आणि कैशलेस उपचार देणे संबंधित रुग्णालयांवर बंधनकारक आहे. मात्र अलीकडेच काही रुग्णालयांकडून नागरिकांकडून पैसे आकारल्याच्या, उपचार नाकारल्याच्या व योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेत महापालिकेने तातडीने तपास मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले,
“महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना पात्र नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही योजना योग्य पद्धतीने राबवली नाही तर दोषी रुग्णालयांवर कठोर प्रशासनिक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.”
महापालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की,
उपचार नाकारले जाणे
पैसे मागितले जाणे
अनुचित अडथळे निर्माण करणे
नियमांचे उल्लंघन
अशी कोणतीही घटना घडल्यास महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधावा.
महापालिकेच्या मते अशी तक्रार नोंदवल्यास नागरिकांना योग्य सेवा मिळण्यास मदत होईल आणि अनियमितता थांबेल.
यासोबतच, सोलापूर महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी आयुष्मान भारत कार्ड तयार करण्याचे काम सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सुरू आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
सोलापूर महानगरपालिकेचा हा निर्णय शहरातील आरोग्यसेवा अधिक पारदर्शक, न्याय्य आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आगामी काही दिवसांत या तपास मोहिमेचे परिणाम शहरातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा प्रभाव पाडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



